ब्राम्हण समाजाकडे बघण्याचा तथाकथित लोकांचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता – खासदार अमर साबळे

0
9

अमरवाणी न्यूज, 27 ऑक्टोबर – ब्राम्हण समाज समरसता भाव, देशभक्ती आणि देशाच्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचा भाव मनात ठेवून एकत्र आला आहे. मात्र समाजातील काही तथाकथित लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आकसाचा आहे. हा दृष्टीकोन बदलला तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असा स्वातंत्र्य, समता, बंधुता तळागाळात रुजविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने सिंचननगर, पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ‘ब्रम्होद्योग-2018’ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाला आज राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी हजेरी लावली. यावेळी खासदार कलराज मिश्र, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, महासंघाच्या उद्योग आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत बडवे, शिरीष देशपांडे यांच्यासह विविध मान्यवर आणि उद्योजक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार साबळे बोलत होते. ते म्हणाले की, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने संपूर्ण देशात या देशाची संस्कृती संवर्धन करण्यासाठी, देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान निर्माण करण्यासाठी, समाजाचं एकत्रीकरण करून त्यांच्या जवळ असलेलं ब्रम्हज्ञान सर्व समाजांपर्यंत पोहचविण्यासाठी, या देशाच्या विकासाच्या गंगेत सर्वांना सामील करता येईल आणि त्यांच्या माध्यमातून एक रोजगार निर्मिती करता येईल तसेच या देशाच्या विकासामध्ये आपलेही योगदान असले पाहिजे, आणि या देशातील गरिबी दूर होण्यासाठी आवश्यक असणारी रोजगार निर्मिती या देशात झाली पाहिजे आणि त्यासाठी समाजाचं एकत्रीकरण झालं पाहिजे हा आदर्श उद्देश लक्षात घेऊन अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने समाजाचं संघटिकरण केले आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून या देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे.

जो या देशाच्या संस्कृतीवर, मातीवर, संविधानावर, राष्ट्रध्वजावर प्रेम करतो, भारतमातेवर श्रद्धा ठेवतो, माझा देश आणि माझी माणसं म्हणून देशातील 125 कोटी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो अशा देशभक्त ब्राम्हण महासंघाचं कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी आणि या सेवेतून आपला देश परमवैभवाला जावा, आपल्या देशाची संस्कृती विश्ववंदनिय व्हावी ही महासंघाची भावनाही कौतुकास्पद आहे. असेही खासदार साबळे म्हणाले. या कार्याचं कौतुक करताना खासदार साबळे यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या ‘वज्जीसंदेश’चा दाखला दिला.

ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक सकारात्मक भाव घेऊन एकत्रितपणे काम करत आहोत. परंतु या चांगल्या उपक्रमाबाबतही वेगवेगळे अर्थ काढणारी लोकं समाजात वावरतात. एखाद्या कोणत्याही समाजाचा कार्यक्रम झाला तर तो पुरोगामी आणि ब्राम्हण समाजाचा कार्यक्रम झाला तर त्याला आकसाने पाहण्याची वाईट खोड या तथाकथित पुरोगामी लोकांना लागलेली आहे. ही खोड मोडण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत समरस समाज निर्माण होणार नाही आणि समरसता भाव समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत स्वातंत्र्य, समता, बंधुता तळागाळात रुजनार नाही. यासाठीच अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने हाती घेतलेले ब्रम्होद्योग नावाचे शस्त्र समाजाच्या उत्थानासाठी आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी असून समाजातील सर्व उद्योजक आणि नवउद्योजकांनी या ब्रम्होद्योग कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार साबळे यांनी यावेळी केले.

ब्रम्होद्योग हा कार्यक्रम समाजातील नवउद्योजकांना नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमात जे मंथन आणि मार्गदर्शन करण्यात येईल त्याची एक पुस्तिका आगामी काळात प्रकाशित करण्यात यावी. ती पुस्तिका समाजातील सर्व उद्योजकांना मार्गदर्शक ठरेल अशी विनंती वजा सूचना खासदार साबळे यांनी संयोजकांना केली.