सरदार वल्लभभाई पटेल एक आदर्शवत मुत्सद्दी नेतृत्व आणि खंबीर प्रशासक – खासदार अमर साबळे

0
16

अमरवाणी न्यूज, 31 ऑक्टोबर – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 562 संस्थानांना एकत्र करून एकसंध भारत निर्माण करणारे सरदार वल्लभभाई पटेल हे मुत्सद्दी नेतृत्व आणि एक खंबीर प्रशासकाचे एक आदर्शवत उदाहरण आहेत, या शब्दात राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वी जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच अशा भव्य पुतळ्याचे आज लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, खासदार अमर साबळे यांनीही सरदार पटेल यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाच्या विकासासाठी निष्पक्ष शासन व्यवस्था असावी हा विचार करणारे व व्यवस्था निर्माण करणारे वल्लभभाई पटेल हे निष्पक्ष शासन व्यवस्थेचे जनक आहेत. स्वातंत्र्य लढयातील सरदार पटेल यांचे नेतृत्व गुण ओळखून महात्मा गांधी यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचा व देश हिताची भूमिका कशी घ्यायची हे कसब त्यांच्या अंगी होते. आपणही सरदार पटेल यांच्यातील नेतृत्व गुणांचा अंगिकार केल्यास आपल्यालाही सामान्य माणसाची सेवा करता येईल.

562 संस्थांचे विलिनीकरण हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा निर्णय देशाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणारा होता. त्यामुळेच भारत एकसंघ राहू शकला. दुरदृष्टी असलेला नेता, करारी स्वभाव व निर्णयक्षमता यामुळेच त्यांना लोहपुरुष म्हंटले जाते, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाने नेहमीच या महापुरुषाची हेटाळणी केली. देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदासाठी देशवासीयांची पहिली पसंती सरदार पटेल असतानाही गांधींनी आपल्या नेहरूप्रेमामुळे पटेल यांच्यावर अन्याय केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. त्या माध्यमातून सरदारांच्या भव्यदिव्य व्यक्तिमत्वाचे दर्शन जगाला घडविण्यात येणार असल्याचेही साबळे यावेळी म्हणाले.