धनाढ्य बिल्डर, व्यावसायिक डी गँगच्या टार्गेटवर!

0
13

अमरवाणी न्यूज : २४ जून –  महानगरातील धनाढ्य बिल्डर, हॉटेल व्यावसायिक, उद्योजकांना लाखो रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्याचे डी गँगचे कारस्थान उघडकीस आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका प्रमुख हस्तकाला खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अटक केल्यानंतर, त्याच्याकडून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. रामदास रहाणे असे या हस्तकाचे नाव आहे.

महानगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावणारा रहाणे हा डी गँगचा शूटर म्हणून काम करतो. त्याच्यावर मुंबई व गुजरातमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल आहेत. रहाणे मूळचा अहमदनगरमधील संगमनेर येथील असून, शुक्रवारी त्याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व अन्य साहित्य जप्त केले आहेत. हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी पाकिस्तानातून वारंवार फोन करून धमकाविण्यात येत होते. तातडीने ५ लाख देण्याची मागणी रहाणेने त्यांच्याकडे केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेल व्यावसायिकाने १९९९ ते २००१ या कालावधीत दुबईत हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्यामध्ये त्याच्या मित्राने ५ लाख दिरम (दुबईतील चलन) गुंतविले. २००१ मध्ये डी गँगच्या शूटरनी त्याची मुंबईत हत्या करून त्याने गुंतविलेल्या रकमेची मागणी व्यावसायिकाकडे केली होती. त्यानुसार, त्याने दुबईतील हॉटेल विकून आलेली रक्कम डी गँगला दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडे पुन्हा ५० लाख रुपये देण्यासाठी पाकमधून फोन येत होता. त्याचप्रमाणे, मुंबईतील हस्तक रहाणेकडे ५ लाख न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी याबाबत आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर, त्यांना संरक्षण पुरवून हस्तकाचा शोध घेण्यात येत होता.