बनावट वस्तूंच्या विक्रीसाठी अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस

0
10

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या नावाजलेल्या  ई-कॉमर्स कंपन्यांना बनावट वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. भारतीय औषध नियंत्रक मंडळाने (DCGI) देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपन्यांच्या उत्पादनाच्या नावाखाली बनावट आणि भेसळयुक्त वस्तूंच्या विक्रीसाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला नोटीस पाठवली आहे. तसेच 10 दिवसांच्या आत या नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही कंपन्यांना देण्यात आला आहे.

डीसीजीआयच्या काही अधिकाऱ्यांनी 5 आणि 6 ऑक्टोबरला देशातील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या छापेमारीत प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपन्यांच्या नावाखाली बनावट आणि भेसळयुक्त उत्पादनांची विक्री केल्याचं समोर आलं आहे. पकडण्यात आलेल्या उत्पादनांची अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवरून विक्री केली जात होती. परवानगी शिवाय बनावट उत्पादनाची विक्री केल्यास दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळेच विक्रीप्रकरणी कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बनावट आणि भेसळयुक्त उत्पादनाबाबत एखादं प्रकरण समोर आल्यास कंपनीकडून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती अॅमेझॉन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अॅमेझॉन ग्राहकांची काळजी घेतं. ग्राहकाने एखाद्या उत्पादनासंदर्भात तक्रार नोंदवल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाते. बनावट आणि भेसळयुक्त उत्पादनाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.