२०१९ची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल होऊ देणार नाही : पवार

0
13

‘२०१९ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होणार आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेत राहणार नाहीत. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेतून पायउतार होईल, पण कुणालाही बहुमत मिळणार नसल्याने त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल,’ असं भाकित करतानाच लोकसभा निवडणुकीत भाजप नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नाही, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

एका खासगी वृत्तवाहिनीशी वार्तालाप करताना शरद पवार यांनी हे भाकित केलं. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे मनमोहन सिंग पंतप्रधान बनले होते. २००४ मध्ये जी स्थिती होती, त्याचीच पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जगभरात आघाडीचं सरकार येत आहे. फ्रान्स आणि युरोपातही आघाडीची सरकारे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. २०१९ च्या निवडणुकीत भाजप मोदी विरुद्ध राहुल गांधी असा प्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तसे होणार नाही. कारण सरकारचं नेतृत्व कोण करेल हे निवडणुकीनंतरच ठरेल, असंही ते म्हणाले.

देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आगामी निवडणुकीत लोकांना परिवर्तन घडवायचं आहे. त्यामुळे केंद्रात आघाडीचं सरकार येईल, असं ते म्हणाले. मात्र देशाचं नेतृत्व कोण करेल हे निवडणुकीनंतरच ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानपदाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी खुलासा केला आहे. काँग्रेसला देशात सत्तांतर घडवून आणायचं आहे. त्यामुळे काँग्रेस पंतप्रधानपदाच्या अटीवर अडून बसलेली दिसत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. २००४ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्याचप्रमाणे कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. कोण होईल हे आज तरी सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.

महाआघाडीची चर्चा नाही

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याशी महाआघाडी करण्याची चर्चा झालेली नाही, असं सांगतानाच वेगवेगळ्या राज्यात तिथले पक्ष भाजपच्याविरोधात एकत्र येतील. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असेल, असं सांगतानाच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचं काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझ्याकडे आकडा नाही

तुम्ही पंतप्रधान होणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आकडे असल्याशिवाय पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहू नये. राजकारणात नेहमीच पाय जमिनीवर असावेत. पंतप्रधान बनण्यासाठी आमच्याकडे आकडे नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.