हार्बर मार्गावर ब्लॉकमुक्त रविवार, मध्य, ट्रान्स हार्बरवर ब्लॉक

0
1

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ब्लॉकमुक्त रविवारची घोषणा करून सुखद धक्का दिला आहे. ब्लॉकमुक्त रविवार असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तर, मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावर रविवारी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. या काळात लोकल फेऱ्या परळ-दिवा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविल्या जातील. यामुळे लोकल फेºया २० मिनिटे विलंबाने धावतील.प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जलद लोकलला नेहमीच्या थांब्यांसह अतिरिक्त थांबा देण्यात येईल.

ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी/ नेरूळ अप -डाऊन मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ब्लॉक आहे. या काळात लोकल बंद असून विशेष लोकल चालविण्यात येतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नाही; मात्र वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी ते रविवारी रात्री २ वाजून ५० मिनिटांपर्यंत ३ तासांचा ब्लॉक आहे. डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्री १ वाजून २५ मिनिटे ते पहाटे ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत कामे करण्यात येतील.