स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्पासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत

0
13

मेट्रो प्रकल्पाच्या कामात कोणतीही चूक राहू नये यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात पहिल्यांदाच ५ डी-बीम या तंत्रज्ञानाचा वापर पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी होत असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खर्चापासून ते वेळेच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गिकांची कामे शहरात सुरू आहेत. या दोन्ही मार्गिकेसाठी एकूण ११ हजार ४२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून दोन्ही मार्गाची एकूण लांबी ही ३१ किलोमीटर आहे. या दोन्ही मार्गिकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रकल्पाच्या कामात चूक राहू नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ५ डी-बीम या तंत्रज्ञानाचा वापर महामेट्रोकडून करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड ही मार्गिका डिसेंबर २०१९ पर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

मेट्रो प्रकल्पाच्या कामाची अद्ययावत प्रगती मिळण्यास मदत होत असून मार्गावर असलेल्या विविध कामांचे आराखडे, त्यांची रचना, बिलांचा हिशोब या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना मिळण्यास मदत होत आहे. शिवाजीनगर न्यायालयाजवळील मेट्रोच्या कार्यालयात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी कामाच्या नोंदी कागदावर घेतल्या जात होत्या. पारंपरिक पद्धतीने ही कामे होत असल्यामुळे कामात अनेक चुका होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.