सायनापुढे सलामीलाच ताय झूचे कडवे आव्हान

0
11

अमरवाणी न्यूज, २३ फेब्रुवारी – पुढील महिन्यात होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालपुढे सलामीलाच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या तैवानच्या ताय झू यिंगचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र पी. व्ही. सिंधूला पहिला अडथळा ओलांडणे फारसे अवघड जाणार नाही.

जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या सायनाने २०१५मध्ये ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. ताय झू यिंगने गेल्या महिन्यात इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला पराभूत केले होते. त्याची परतफेड करण्याची संधी १४ ते १८ मार्च या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत सायनापुढे असणार आहे.

सिंधूचा पहिला सामना थायलंडच्या पोर्नपावी चोच्युवाँगशी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेवेन झांगशी तिचा सामना होऊ शकेल. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत झांगनेच सिंधूला हरवले होते.

मागील हंगामात चार विजेतेपदांसह विजयी घोडदौड राखणाऱ्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या किदम्बी श्रीकांतची पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्रिसे लीव्हरडेझशी गाठ पडणार आहे. पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांच्यापुढे पहिल्या फेरीत आव्हानात्मक प्रतिस्पर्धी असणार आहेत.