सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ‘शाळा बंद’

0
9

खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा भरताना येणाऱ्या असंख्य अडचणी, शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येणारी दुय्यम दर्जाची वागणूक, शिपाई भरतीवर असणारी बंदी, अशा विविध प्रश्‍नांवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळातर्फे येत्या शुक्रवारी (ता.२) शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास दहा हजार खासगी शिक्षण संस्था या आंदोलनात सहभागी होणार असून जवळपास २० हजारांहून अधिक शाळा बंद राहणार आहेत.

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी वारंवार विनंती करूनही मुख्यमंत्री प्रतिसाद देत नाही. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याचा शिक्षण विभागातर्फे सोयीनुसार अर्थ लावला जात असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकेतर अनुदानही तुटपुंजे असून ते सर्व शाळांना मिळत नाही, असे प्रश्‍न महामंडळातर्फे मांडण्यात आले आहेत.