शरद पवारांनी दुष्काळाचे राजकारण करू नये ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
17

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शब्दच्छल करून दुष्काळाचे राजकारण करू नये. राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. आठ प्रकारच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकर्‍यांना थेट मदत तसेच पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील सिंचन योजना डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘राजकारण करण्यासाठी अन्य क्षेत्रे आहेत. दुष्काळासारख्या प्रश्‍नावर शब्दच्छल करून राजकारण करू नये. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात काढलेल्या शासन आदेशात दुष्काळ हा शब्दच हद्दपार करून टंचाई, टंचाईसदृश्य शब्द आणला होता. मात्र भाजप शासनाने शासन निर्णयातील ‘टंचाई’ हा शब्द काढून ‘दुष्काळ’ हा शब्द आणला आहे. दुष्काळाबाबत शासन संवेदनशील आहे. राज्यात १८० तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. केंद्राचे पथक पाहणी करेल. दुष्काळी परिस्थितीवर साक्षांकन होईल व शेतकर्‍यांना थेट मदत केली जाईल.’’

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, टेंभू, ताकारी, म्हैसाळ आदी सिंचन योजनांचे अभूतपूर्व काम भाजप सरकारच्या काळातच झाले आहे. केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, वाकुर्डे बुद्रूक आदी सिंचन योजनांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल.’’

टेंभू चौथा टप्प्याचे डिसेंबरमध्ये लोकार्पण; पाचवा टप्पा मार्चमध्ये पूर्ण
‘‘टेंभू योजनेला प्रधानमंत्री सिंचन योजनेतून ४ हजार ४६८ कोटी व कृष्णा खोरे उपसा सिंचनमधून ६० कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. टेंभूच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर २०१८ मध्ये होईल. पाचव्या टप्प्याचे काम मार्च २०१९ पर्यंत वेगाने पूर्ण केले जाईल. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील एक लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्‍याचेही मुख्यमंत्री म्‍हणाले.

२० वर्षांत जेवढे काम झाले, तेवढे ३ वर्षांत केले; सातशे कोटींची बचत
फडणवीस म्हणाले, जत तालुक्यातील टप्पा ६ अ आणि टप्पा ६ ब आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, जाखापूर योजना लवकरच कार्यान्वित होईल. त्यातून ११ हजार ७२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याची लांबी एक हजार ४२ किलोमीटर आहे. गेल्या २० वर्षात पाचशे किलोमीटर लांबीचा कालवा झाला. पण भाजप सरकारच्या कालावधीत गेल्या तीन-साडेतीन वर्षांत ३४५ किलोमीटर कालव्याचे काम झाले आहे. भाजप सरकारने गतीने काम केले आहे. बंदिस्त पाईपलाईनमुळे सातशे कोटी रुपयांनी योजनेची किंमत कमी झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.