विराट ग्रेटच, पण सचिन हा सचिन आहे: हरभजन

0
10

‘विराट कोहली हा चॅम्पियन आहे. तो सध्याचा सर्वोत्तम फलंदाज असून युवा पिढीचं प्रेरणास्थान आहे. पण सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना करणं योग्य होणार नाही. सचिन हा सचिन आहे. माझ्यासाठी सचिनच नंबर वन आहे,’ असं प्रांजळ मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं व्यक्त केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. विराटनं नुकतंच वनडे करिअरमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराटनं याबाबतीत सचिनचाही विक्रम मोडीत काढला. सर्वात कमी सामन्यांमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज म्हणून विराटची नोंद झाली. त्याच्या या कामगिरीमुळं त्याची सचिनशी तुलना होऊ लागली आहे. सचिनचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेला फलंदाज म्हणून विराटकडं पाहिलं जाऊ लागलं आहे. याबाबत विचारलं असता हरभजननं विराटचं तोंडभरून कौतुक केलं.

‘विराट हा माझ्या लहान भावासारखा आहे. त्याच्यासारखी फलंदाजी करणं सोपं नाही. मोठ्या आत्मविश्वासानं तो मैदानात उतरतो. तो ‘संकटमोचक’ आहे. सामना स्वत:च्या जोरावर जिंकण्याची हिंमत ठेवणारा खेळाडू आहे. सध्याचा नंबर एकचा फलंदाज आहे,’ असं भज्जी म्हणाला. सचिन आणि विराटच्या तुलनेवर मात्र त्यानं काहीसं वेगळं मत नोंदवलं. ‘विराट महान आहेच. पण मी आजवर अनेक दिग्गज फलंदाजांसोबत खेळलोय. सचिनसोबत खेळलोय. त्याच्याबद्दलचं माझ्या मनातलं स्थान वेगळं आहे. त्याच्याकडं बघून अनेक तरुण क्रिकेट खेळायला लागले. स्वत: मीही क्रिकेटमध्ये आलो. विराटही ते अमान्य करणार नाही. त्यामुळं विराटनं त्याचा विक्रम मोडला तरी सचिनच माझ्यासाठी नंबर वन असेल. त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही’, असं हरभजन म्हणाला.