राहुल एन्ड कंपनीने देशाच्या जावयाविषयी भूमिका स्पष्ट करावी; खासदार अमर साबळेंचा चिमटा

0
103

अमरवाणी न्यूज, 13 फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या राहुल अँड कंपनीने आधी नॅशनल हेरॉल्ड आणि देशाचे जावई म्हणून मिरवणाऱ्या राबर्ट वडेराच्या मनी लँडिंगप्रकरणी काँग्रेस पक्षाची भूमिका देशासमोर मांडावी, असा शाब्दिक चिमटा राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी काढला आहे.

राफेल मुद्द्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने देशभर गदारोळ घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या विषयी आपली भूमिका खासदार साबळेंनी मांडली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम आणि निष्कलंक पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या स्वच्छ कार्यकर्तृत्वामुळे देशातील काँग्रेससहित सर्व विरोधी पक्षांना गेल्या साडे चार वर्षात त्यांच्याविरोधात आरोप करण्यासाठी मुद्दे न मिळाल्यामुळे या विरोधकांची अवस्था पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यामुळे हाती येणाऱ्या कोणत्याही मुद्द्याचे भांडवल करून हे विरोधक पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाला खीळ बसून एकप्रकारे देशाला वेठीस धरण्याचा प्रकार विरोधकांकडून केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याआधी राहुल गांधी आणि त्यांच्या नेत्यांनी नॅशनल हेरॉल्ड आणि देशाचा जावई असलेल्या रॉबर्ट वडेराच्या मनी लँडिंगप्रकरणी पक्षाची असलेली भूमिका देशवासीयांसमोर मांडावी. आणि त्यानंतर खरा देशद्रोही कोण आहे हे देशाची जनताच ठरवेल असा खरमरीत टोला खासदार साबळे यांनी यावेळी लगावला.