राम मंदिर आंदोलनासाठी नागपूरमधून शंखनाद, २५ नोव्हेंबरला ‘हुंकार रॅली’

0
9

राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्यानंतर आता या आंदोलनासाठी मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. शनिवारी सकाळी नागपूरमध्ये संघ मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत भाजपाचे नागपूरमधील नगरसेवक, आमदारांसह संघाशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. राम मंदिरासाठी संघातर्फे हुंकार रॅलीचे आयोजन केले जाणार असून पहिली हुंकार रॅली संघाच्या भूमीत म्हणजेच नागपूरमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

नुकतीच संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक भाईंदर- उत्तन येथील केशवसृष्टी येथे पार पडली होती. या बैठकीच्या समारोपाप्रसंगी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत भूमिका मांडली होती. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी हा आमच्या प्राध्यानक्रमाचा मुद्दा नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे केवळ खेदजनक नव्हे तर हिंदूंच्या भावनांचा अपमान करणारे आहे. न्यायालयाने आपल्या प्राधान्यक्रमाचा विचारा करावा, अन्यथा गरज पडल्यास राम मंदिरासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभे करावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी या पत्रकार परिषदेत दिला होता.

संघाने आता या आंदोलनासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. संघ आणि संघाशी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींची शनिवारी रेशीमबागेत बैठक पार पडली. पाचशेहून अधिक जण या बैठकीला उपस्थित होती. यात भाजपाचे नागपूरमधील सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच आमदार कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकरराव देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने यांचा देखील समावेश होता. तसेच विश्व हिंदू परिषद व अन्य संघटनांचे प्रतिनिधीही तिथे हजर होते.

२५ नोव्हेंबरला नागपूरमध्ये आंदोलनासंदर्भात पहिला मेळावा म्हणजेच हुंकार रॅली होणार असून या रॅलीसाठी लाखो लोक येतील, असा अंदाज आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबतच चर्चा झाल्याचे समजते. साध्वी ऋतंभरा आणि अन्य मंडळी २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हुंकार रॅलीतील प्रमुख वक्ते असतील, असेही समजते. नागपूरप्रमाणेच दिल्ली व बेंगळुरूतही हुंकार रॅलीचे आयोजन केले जाईल आणि शेवटची हुंकार रॅली अयोध्येत होईल, असे समजते.