राफेलसाठी रिलायन्सला का निवडले, हे डसॉल्टलाच माहिती : सीतारामन

0
20

राफेल खरेदीप्रकरणी गैरव्यवहारांचे आरोप फेटाळताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी रिलायन्सची निवड कुणी आणि का केली हे डसॉल्ट एव्हीएशनलाच माहिती असे सांगत हात झटकले आहेत.

सीतारामन आज मुंबईमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडिया समिट मध्ये हे मत मांडले. यावेळी त्यांनी राफेल विमानखरेदीवरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर उत्तर दिले. भारताला विमाने विक्री करताना कोण भागिदार निवडायचा आणि किती भागिदार निवडायचे हे डसॉल्टवरच अवलंबून आहे. करारातील हा निकष 2012 मधील मूळ निविदेमध्ये सुद्धा होता. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

तसेच डसॉल्टने रिलायन्सला निवडले की नाही, की फक्त रिलायन्सची निवड केली, की आणखी किती भागिदार आहेत हे डसाल्टलाच माहीत आहे. त्यांनी अद्याप सरंक्षण मंत्रालयाला अधिकृत कळवलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राफेलची खरेदी पूर्णपणे काँग्रेस सरकारच्या काळात निश्चित केलेल्या करारानुसारच झाली. फक्त त्यावेळच्या सरकारने 18 विमाने थेट खरेदी करण्याचे ठरवले होते. मोदी सरकारने 36 विमानांचा निर्णय घेतला. सध्या दोन तुकड्यांची तात्काळ निकड असल्याने 36 विमाने खरेदी केली जात आहेत, असेही सीतारामन यांनी म्हटले.

शस्त्रे कोणाकडून घ्यायची हे भारतच ठरविणार, अमेरिका नाही
रशिया कडून शस्त्र खरेदीबाबत अमेरिकेची कुठलीही नाराजी नाही. भारताला असलेला धोका पाहता प्रबळ संरक्षणाची गरज असल्याची भारताची भूमिका अमेरिकेला पटली आहे. शस्त्र कोणाकडून खरेदी करायची हा सर्वस्वी भारताचा निर्णय असेल, अमेरिकेने चॉईस देण्याची गरज नाही, असेही सीतारामन यांनी सांगितले.