राज्याच्या 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर

0
5

राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती आणि राज्याच्या 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

आज राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचं औचित्य साधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाची घोषणा केली आहे. त्यामुळे यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दुष्काळासंबंधी घोषणा करण्यासाठी यांना मुहूर्ताची गरज लागते का अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या या घोषणेवर टीका केली आहे.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांनी सेलिब्रेशनची वाट पाहिली. कर्जमाफी मिळालेल्या अनेकांना अद्याप पैसे मिळाले नाही त्यामुळे या फक्त घोषणा आहेत याची अंमलबजावणी होणार नाही अशी टीका त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केली.

दुष्काळ घोषित केल्याचे आदेश बुधवार ऑक्टोबर 31पासून आमलात आणले जातील. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत सुविधा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.