आरोग्याविषयी जागृती वाढल्याने दिवाळीमध्ये मिठाईऐवजी सुकामेवा खरेदीला व भेट देण्यास पसंती वाढू लागली आहे. मुंबई बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये काजू, बदाम व इतर सर्वच सुक्यामेव्याची आवक वाढली आहे. सद्य:स्थितीमध्ये सरासरी २५० टन मालाची आवक होत असून, पुढील काही दिवसांमध्ये ती दुप्पट होण्याची शक्यता आहे.
यामध्ये काजू व बदामाची आवक सर्वाधिक आहे. सद्य:स्थितीमध्ये गोवा व कर्नाटकमधून काजूची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, होलसेल मार्केटमध्ये ८०० ते १२०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. बदामाची आवक अमेरिका, इराण व इतर देशांमधून होत आहे. बाजार समितीमध्ये ७०० ते १००० रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. आक्रोड कॅलिफोर्निया, काश्मीरवरून विक्रीसाठी येत आहे. इराणवरून पिस्ताची आवक होत आहे. खारीक व खजूरचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, याची आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
व्यापारी प्रतिनिधी कीर्ती राणा यांनी सांगितले की, आरोग्यासाठी सुक्यामेव्याचे महत्त्व नागरिकांना पटले आहे. साधारणत: पाच हजार कंटेनरची वर्षभरात आयात होत असते. बदाम कच्चा स्वरूपात येत असतात. बदाम फोडण्यामुळे महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू लागला. पूर्वी मुंबईमधून देशातील अनेक राज्यांमध्ये सुकामेवा विक्रीसाठी पाठविला जात होता. येथून अनेक देशांमध्ये निर्यातही होत होती; परंतु आता शासनाने थेट पणनचे धोरण स्वीकारले असल्यामुळे बाजार समितीव्यतिरिक्त खरेदीचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. मॉल्समधूनही सुकामेवा खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. पुढील आठ दिवस सर्वाधिक विक्री सुक्यामेव्याचीच होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.