मी तुला 120 शतकांचे लक्ष्य देतो; कोहलीला शोएब अख्तरचं ‘अतिविराट’ चॅलेंज!

0
4

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेत कर्णधार विराट कोहली विक्रमांचे शिखर सर करत आहे. विशाखापट्टणम येथे वन डेतील दहा हजार धावांचा पल्ला पार करणाऱ्या कोहलीने पुण्यातील सामन्यात आणखी एक शतकी खेळी केली. सलग तीन वन डे सामन्यांत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. मात्र, त्याचे हे कारकिर्दीतले 38वे शतक भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाही.

कोहलीच्या या विक्रमी खेळीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही कोहलीची भरभरून प्रशंसा केली. मात्र, त्याचवेळी रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएबने कोहलीला अतिविराट चॅलेंज दिले. त्याने ट्विटरवर एक पोस्ट टाकून कोहलीला 120 शतकांचा पल्ला पार करण्याचे आव्हान दिले. तो म्हणाला,” गुवाहाटी, विशाखापट्टणम, पुणे. विराट कोहली हे अजब रसायन आहे. त्याने वन डेत सलग तीन शतक झळकावली. त्याचे खूप खूप अभिनंदन. तु असाच खेळत राहा. मी तुला 120 शतकांचे लक्ष्य देतो.”