माझ्या करिअरचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं- साजिद खान

0
3

‘मी टु’ मोहिमेअंतर्गत झालेल्या धक्कादायक आरोपांमुळे दिग्दर्शक साजिद खान गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक महिलांनी गंभीर आरोप साजिद खानवर केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहित यापूर्वी पत्रकार, मॉडेल आणि एका साहाय्यक दिग्दर्शिकेनं साजिदचा पर्दाफाश केला. त्यानंतर साजिद खानसोबत काम न करण्याचा निर्णय अक्षय कुमार आणि अनेक कलाकारांनी घेतला. साजिदवर असलेले गंभीर आरोप पाहता भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA) साजिदला नोटीस पाठवली. या नोटीसीला साजिदनं अखेर उत्तर दिलं आहे.

‘या आरोपांमुळे माझ्या करिअरचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझी बहिण आण आईलाही यामुळे अतोनात दु:ख झालं आहे. माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाही. पण एकच बाजू ऐकून त्यावर कोणतंही मत तयार करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. यासाठी कोणत्याही प्रकारचं साहाय्य करायला मी तयार आहे’ असं उत्तर साजिदनं संघटनेला दिलं आहे. साजिदविरुद्ध दिग्दर्शक संघटनेकडे चार तक्रारी आल्या आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी दिली आहे.

साजिद खान ‘हाऊसफुल ४’ चं दिग्दर्शन करणार होता. मात्र महिलांनी केलेल्या आरोपांमुळे साजिदनं नैतिक जबाबदारी स्वीकारत या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच अक्षय कुमारनंही त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला.

अभिनेत्री सलोनी चोप्रा, प्रियंका बोस आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर साजिद खान वादाच्या भोवऱ्यात सापडला. या प्रकरणात साजिदची बहिण फराह खान हिनं देखील साजिदची बाजू न घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर साजिदनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:वरचे सारे आरोप नाकारले होते. वेळ आल्यावर खरं काय ते लोकांसमोर येईल, पण मी निर्दोष आहे असं साजिदनं ट्विटर पोस्टद्वारे स्पष्ट केलं.