महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत?

0
3

लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण दोन्ही राज्यांमधील वाढता सत्ताविरोधी रोष परवडणारा नसल्याने लोकसभेसोबत विधानसभांच्या एकत्र निवडणुका झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सत्तेत परतण्याची संधी असेल, अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भावना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २०१४ च्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेवर भाजपने दोन्ही राज्यांमध्ये सत्ता संपादन केली होती. पण दोन्ही राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित कामगिरी बजावता आलेली नाही. लोकसभेसोबत दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे गेल्यास भाजपचे कमीत कमी नुकसान होईल आणि सत्तेत परतणे अवघड ठरणार नाही, असे भाजपनेतृत्वाला वाटते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आहे. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची घसरगुंडी उडाल्यास ही दोन्ही राज्ये भाजपच्या हातून निसटतील, हेही कारण एकत्र निवडणुका घेण्यामागे आहे.

हरयाणामध्ये मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे नेतृत्व भाजपला सत्ता परत मिळवून देण्यास असमर्थ ठरणार असल्याची भावना आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असले, तरी भाजप आणि शिवसेना यांच्यात संभाव्य युतीवरून निर्माण झालेला संशय आणि युती झाल्यास विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे समजते. जागावाटप आणि युतीचा परस्परसंशय संपविण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेणेच सोयीस्कर ठरेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदीच तारणहार ठरतील, या आशेने महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये सहा महिने आधी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. या दोन राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्यास लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा, आंध्र प्रदेश, सिक्कीमसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होतील. महाराष्ट्र आणि हरयाणातील मुदतपूर्व विधानसभा निवडणुकांची कुणकुण काँग्रेसलाही लागली असून दोन्ही राज्यांतील नेते व कार्यकर्त्यांना लोकसभेसोबत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते.