मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन

0
16

अमरवाणी न्यूज : २९ जूलै – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल लवकर द्यावा. हा अहवाल सादर झाल्यावर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात विधान भवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. आयोगाने आपला अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांच्या समितीने केली आहे. आयोगानेदेखील तो लवकर देण्याचे सूतोवाच केले आहे. गटनेत्यांच्या या बैठकीत जो ठराव संमत झाला आहे तोदेखील आयोगाला देण्यात येईल. अहवाल लवकर सादर करावा अशी विनंती पुन्हा आयोगाला करण्यात येईल. आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आयोग सुचवेल त्यानुसार नवीन कायदा किंवा ठराव संमत करण्यात येईल. न्यायालयात कायदा टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, ऍड. अनिल परब आदी उपस्थित होते.