मफतलाल कंपनीच्या जागेचा होणार तिसऱ्यांदा लिलाव

0
7

कळवा येथील मफतलाल कंपनीची 123 एकर जमीन विकून कामगारांना त्यांच्या हक्काची 157 कोटींची देणी द्यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही अद्यापपर्यंत कामगारांना ही देणी मिळाली नाहीत. दोन वेळा जमिनीचा लिलाव करण्यात आला, पण न्यायालयाने ठरवून दिलेल्या 1 हजार 132 कोटी रुपयांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी कुणी पुढे न आल्याने आता तिसऱयांदा ‘मफतलाल’च्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. तसा आदेशच न्यायालयाने दिला असून आता तरी एखादा बिल्डर जमीन विकत घेण्यासाठी पुढे येईल व आम्हाला देणी मिळतील, अशी आशा कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.

गेली 28 वर्षे मफतलाल कंपनीचे कामगार देणी मिळण्यासाठी विविध मार्गांनी लढा देत आहेत. 1989 मध्ये ही कंपनी बंद पडली आणि 3 हजार 300 कामगार देशोधडीला लागले. अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. दरम्यानच्या काळात 1 हजार 500 कामगारांचा मृत्यू झाला. मफतलाल कंपनीची सुरुवातीला 303 एकर एवढी जमीन होती. त्यापैकी 123 एकर जमीन विकण्याचा आदेश न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी गेल्या वर्षी दिला होता. या संपूर्ण व्यवहारासाठी न्यायालयाने लिक्विडेटर नेमला असून जमिनीची किंमत 1 हजार 132 कोटी रुपये एवढी ठरवण्यात आली.
कोर्टाच्या आदेशानुसार दोन वेळा मफतलालची जमीन विकण्यासाठी लिलाव पुकारण्यात आला, पण प्रत्यक्षात कोणीही बिल्डर किंवा कंपनी ही जमीन विकत घेण्यासाठी पुढे आली नाही. त्यामुळे अखेर तिसऱयांदा जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून कामगारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये मंदी असल्याने ‘मफतलाल’च्या जमीन विक्रीत अडचणी आल्या असून तिसऱयांदा लिलावाच्या वेळी जर कुणी पुढे आले नाही तर लिक्विडेटर जमिनीची किंमत कमी करण्याची शक्यता आहे. दरम्यान ‘मफतलाल’च्या कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगार नेते संजय वढावकर यांनी केला आहे.

सिडकोचा दावा फेटाळला

मफतलालच्या जमिनीचा वाद गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. या जमिनीपैकी काही भागांवर सिडकोने आपला हक्क सांगितला होता. न्यायालयातदेखील तसा दावा केला, पण आवश्यक असलेले पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने सिडकोचा दावा फेटाळून लावला. आता 4 लाख 99 हजार 445 स्क्वेअर मीटर एवढय़ा जमिनीचा तिसऱयांदा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.