भाजपसोबत छुपी नव्हे जाहीर युतीच समजा – नारायण राणे

0
9

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिथे उमेदवार असतील तेथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचेही उमेदवार उभे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे ठणकावून सांगितले. ‘‘शिवसेनेच्या विरोधात तुमच्या पक्षाचा उमेदवार म्हणजे ही भाजपसोबत छुपी युती आहे का’’ या प्रश्नावर राणे यांनी, ‘‘तसे तुम्हाला समजायचे असेल तर त्याला माझी हरकत नाही’’ अशा शब्दात त्यावर खुलासा केला. औरंगाबादेत शिवसेनेला नव्हे तर खैरे यांना पराभूत करायचे आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या बांधणीसाठी आणि लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यासाठी राणे व त्यांचे पुत्र आमदार नीलेश राणे येथे आले होते. नारायण राणे यांनी पत्रकार बठकीत शिवसेना व भाजपची युती, मराठा आरक्षण, लोकसभेनंतर निकालाचे चित्र, आदींबाबत रोखठोक मते व्यक्त केली. ते म्हणाले, पक्ष किमान पाच लोकसभेच्या जागा लढवणार आहे. जिथे शिवसेनेचा उमेदवार तिथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष उमेदवार देईल. औरंगाबादेत खैरे यांच्याविरोधात सुभाष किसनराव पाटील हे उमेदवार असणार आहेत.

आपण थेट भाजपचे खासदार नसून सहयोगी पक्षाचा सदस्य म्हणून राज्यसभेवर आहे. राज्यसभेवर असल्यामुळे लोकसभा लढवणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीनंतरच्या निकालाचा अंदाज व्यक्त करताना राणे म्हणाले, ‘‘भाजपला २००पेक्षा अधिक जागा मिळतील. पण पंतप्रधान कोण होईल, हे सांगता येणार नाही. मात्र मोदीच पंतप्रधान होतील.’’

शिवसेनेविरोधात लढणाऱ्या आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना समजायचे का, यावरही राणे यांनी, ‘‘हरकत नाही’’ असे उत्तर दिले. शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, सेनेने सत्तेसाठी भाजपसोबत युती केलेली आहे. शिवसेनेने साडेचार वर्षे मोदींवर टीका केली आणि आता सत्तेसाठी युती केली. ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी त्यांची गत झालेली आहे. आरक्षणावर बोलताना राणे म्हणाले, मराठा आरक्षण हे कायद्याचा अभ्यास करूनच दिलेले आहे. घटनेच्या कलम १५ व १६ अन्वये दिलेले असल्यामुळे आरक्षण न्यायालयात टिकणार आहे.

नाणार प्रकल्प रद्द केला, हे आमचे यश आहे, शिवसेनेचे नाही. कारण आणण्यापासून ते रद्द करण्यापर्यंतची खेळी शिवसेना नेते करीत असतात, अशा शब्दात त्यांनी सेना नेत्यांवर टीका केली. यावेळी पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी महापौर सुदाम रामदास सोनवणे यांचीही उपस्थिती होती.