भरघोस नफ्याचे आमिष,स्कीमच्या नावाने हजारो नागरिकांना कोटय़वधींचा चुना

0
9

‘आमच्या स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि त्यावर प्रत्येक महिन्याला भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखविण्याबरोबरच ‘गुंतवणुकीवर चांगला नफा मिळेल. इस्लाममध्ये व्याज देणे मंजूर नसल्याने गुंतवणुकीवर आम्ही भरघोस नफा देऊ’, अशाप्रकारे मुस्लिम नागरिकांना भावनिक करून हजारो मुस्लिम गुंतवणूकदारांना 500 कोटींचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्हे शाखा याचा अधिक तपास करीत आहेत.

शान ए इलाही शेख यांच्या तक्रारीनुसार नोव्हेरा शेख, हिरा गोल्ड एक्झीम लि., हिरा रिटेल प्रा. लि., हिरा टेक्सटाईल लि., हिरा फुडेक्स लि., सलीम अन्सारी (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह) यांच्या विरोधात जे. जे. मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तो पुढील तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी व आरोपीत संस्थांनी गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. ‘एकदा पैसे गुंतवा आणि प्रत्येक महिन्याला त्यावर भरपूर नफा मिळवा’ असे आमिष दाखविण्यात येत होते. त्यानुसार मी सुरुवातीला दोन लाख एका योजनेमध्ये गुंतवले. त्या गुंतवणुकीवर 14 महिन्यांच्या मुदतपूर्ती कालावधी करीत महिना 2.8 ते 3.2 टक्के परतावा मिळेल असे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी मला काही महिने चांगला परतावा दिला. त्यामुळे माझा विश्वास बसल्याने मी पुन्हा एक लाख गुंतवले. परंतु जून 2018 पासून आरोपींनी मला महिन्याला मिळणारे पैसे देण्यास बंद केले. त्यामुळे विचारणा केली असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यानंतर गुंतवणुकीची मुदतपूर्ती झाल्यामुळे आरोपींच्या मुंबईस्थित कार्यालयात गेलो आणि माझी मॅच्युअर्ड झालेली गुंतवणुकीची रक्कम परत देण्यात यावी अशी मागणी केली, पण तेव्हापासून मला केवळ पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. माझी फसवणूक झाल्याचे कळताच जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे शान ए इलाही शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भावनिक करून प्रवृत्त करतात

आरोपी प्रचंड हुशार आहेत. ते इस्लामच्या नावाने भावनिक करतात. तसेच आकर्षक नफा देण्याची बतावणी करून केवळ मुस्लिम नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. अशाप्रकारे त्यांनी हजारो नागरिकांना विविध स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून आरोपींनी 500 कोटींचा चुना लावल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.