‘बिग बॉस’च काय पण बॉलिवूडमध्येही पुन्हा जायचं नाही- तनुश्री

0
6

अभिनेत्री तनुश्री दत्तानं आठ वर्षांपूर्वी बॉलिवूडला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर तनुश्री हे नाव झगमगत्या दुनियेतून पूर्णपणे विस्मरणात गेलं. मात्र काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्रीची चर्चा आता सगळीकडेच सुरू आहे. बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेची एका अर्थानं सुरूवात तनुश्रीनं केली असं म्हटलं जातं. मात्र हा सारा खटाटोप तिनं पुनरागमनासाठी केला आहे असाही आरोप तिच्यावर झाला. एखादा वाद निर्माण करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची हा फंडा बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींसाठी नवा नाही. त्यामुळे तनुश्रीही आपल्या पुनरागमनासाठी हे सारं करत असल्याचं अनेकांनी म्हटलं. पण, तनुश्रीनं हे आरोप फेटाळून लावले आहे. बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची इच्छाच नसल्याचं तिनं एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी तनुश्रीला ‘बिग बॉस १२’ची ऑफर आल्याचं म्हटलं जातं होतं, तिनंही हे मान्य केलं. मात्र आता ‘बिग बॉस’च काय पण बॉलिवूडमध्येही पुन्हा जायचं नाही. तिथे जाण्याचा उद्देशच नाही असं तिनं स्पष्ट केलं आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तणुक केल्याचा गंभीर आरोप तिनं केला होता. त्यानंतर तिनं दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. पण पुनरागमनासाठी किंवा बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी तिनं दहा वर्षे जुना वाद उकरून काढला अशी टीकाही तिच्यावर मोठ्या प्रमाणात झाली.

मात्र मला या रुपेरी पडद्यावर परतण्याची कोणतीही इच्छा नाही, मी आठ वर्षांपूर्वीच या क्षेत्रातून बाहेर पडले आहे. आठ वर्षे हा खूप मोठा काळ आहे. आता या क्षेत्रात मला अजिबात परतायचं नाही असं म्हणत तिनं आपल्यावरचे आरोप परतवून लावले आहेत. २०१० साली एका हिंदी चित्रपटात ती शेवटची दिसली होती.