‘बधाई हो’ची जादू कायम; कमाई ७० कोटींच्या घरात

0
8

अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सान्या मल्होत्राची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘बधाई हो’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट २०१८ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये सामील झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या शुक्रवारीही जादू कायम असून चित्रपटाची कमाई ७० कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे.

boxofficeindia.com च्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची ओपनिंग सर्वसाधारण झाली असली तरी नंतर मात्र चित्रपटाने कमाईच्या बाबतीत चांगलीच उसळी घेतली. गेल्या गुरुवारी पहिल्या दिवशी चित्रपटाने ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर वीकेंडपासून तिकीट खिडकीवर ‘बधाई हो’चीच जादू पाहायला मिळाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आतापर्यंत कमाईचा आकडा ६९.५० कोटींवर पोहोचला आहे.

आयुष्मान आणि सान्यासह नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. विनीत जैन निर्मित ‘बधाई हो’ हा चित्रपट जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला वीकेंडबरोबरच दसऱ्याच्या सुट्टीचाही चांगला फायदा झाला.