प्रकाश आंबेडकरांबाबत वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेले ‘ते’ वृत्त कल्पोकल्पित आणि खोटे; खासदार अमर साबळेंची प्रेस कौन्सिलकडे तक्रार

0
224

प्रतिनिधी, 3 जानेवारी – भीमा कोरेगाव दंगलीमागे भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा कोणत्याही प्रकारचा दावा आपण कधीही केला नसल्याचा खुलासा राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे. तसेच अशाप्रकारच्या खोट्या बातम्या खोडसाळपणाने पसरवून समाजात तणाव निर्माण करण्याचे काम वृत्तवाहिनीने करू नये, असे आवाहनही खासदार अमर साबळे यांनी केले आहे.

बुधवारी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. दरम्यान, या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीच्या मागे भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप खासदार अमर साबळेंनी केल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी झी 24 तासने गुरुवारी दुपारी प्रसारित केले. मात्र असे कोणतेही विधान आपण केले नसून हे वृत्त खोटे असल्याचे खासदार साबळेंनी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना खासदार अमर साबळे म्हणाले की, दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नाही.

भीमा कोरेगाव घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून यावर्षी सर्व समाजाने एकत्र येऊन संघटितपणे भीमा कोरेगाव येथे शौर्यदिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा केला. अशा वातावरणात खोडसाळपणाने खोटे आणि कल्पोकल्पित वृत्त प्रसारित करून समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार असून हे अत्यंत खेदजनक आहे.

दरम्यान, या प्रकरणी सेक्रेटरी; प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, सेक्रेटरी; इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन आणि झी 24 तास वृत्तवाहिनीचे चेअरमन सुभाष चंद्रा यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी यावेळी दिली.