पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक मुक्त

0
3

शालेय पोषण आहार योजनेत देण्यात येणाऱ्या आहाराची चव घेऊन त्यांची नोंद करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर टाकली होती. या जबाबदारीला मुख्याध्यापकांनी विरोध दर्शविल्यानंतर अखेर शिक्षण विभागाने पोषण आहार योजनेतील मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याध्यापकांना या कामातून पूर्णता वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.

शालेय पोषण आहाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आहाराची चव घेण्याची जबाबदारी स्वयंपाकी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि मुख्याध्यापक किंवा योजनेशी संबंधित शिक्षक या तीन स्तरांवर सोपविण्यात आली होती. मुख्याध्यापकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने मुख्याध्यापक संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. शाळा व्यवस्थापनाच्या बहुतांश जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर असल्याने आहाराची चव घेऊन त्याची नोंद करणे शक्‍य नसल्याची भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली होती. याबाबत सरकार दरबारी पाठपुरावाही करण्यात येत होता. अखेर शिक्षण विभागाने पोषण आहाराची चव घेण्याच्या जबाबदारीतून काही प्रमाणात मुख्याध्यापकांची मुक्तता केली आहे.