पालन करता येईल असेच निर्णय कोर्टाने द्यावेत : अमित शहा

0
5

केरळच्या कन्नूरमध्ये पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप शबरीमलाच्या भक्तांच्यापाठी खंबीरपणे उभा असल्याचं स्पष्ट केलं. तसेच कोर्ट आणि सरकारनेही आस्थेशी संबंधित आणि ज्याचे पालन केलं जाईल, असेच निर्णय द्यावेत, असं आवाहनही अमित शहा यांनी केलं. यावेळी त्यांनी केरळ सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.

केरळ सरकारने अयप्पाच्या भक्तांवर दमनचक्र सुरू केलंय, पण भाजप या भक्तांच्यापाठी पहाडा सारखा उभा राहील. जर हे दमनचक्र थांबले नाही तर भाजप कार्यकर्ते त्याला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देतानाच कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये मंदिरांच्या परंपरा तोडण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ज्या आदेशांचं पालन करता येईल, असेच निर्णय कोर्ट आणि सरकारने दिले पाहिजे. लोकांच्या आस्थेला ठेच पोहोचवणारे आदेश देऊ नये. संविधानाच्या अनुच्छेद १४चं नेहमीच उदाहरण दिलं जातं. तसेच अनुच्छेद २५ आणि २६ अन्वये धर्माचं पालन करण्याचा अधिकार असल्याचंही सांगितलं जातं. पण एक अधिकार दुसऱ्या अधिकाराच्या विरोधी कसा असू शकतो? हिंदू धर्माने कधीच परंपरेच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला नाही. उलट त्यांना देवीचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली आहे, असंही ते म्हणाले.

देशभरातील अनेक मंदिरात वेगवेगळ्या परंपरांचं पालन केलं जातं. भगवान अयप्पांचेही अनेक मंदिरं देशात असून तिथे महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. या मंदिरात अयप्पाची ब्रह्मचारी मूर्ती आहे. त्यामुळेच महिलांना प्रवेश नाकारला जातो. देशातील अनेक मंदिरं अशी आहेत की जिथे केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो. पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. मात्र सर्वजण शबरीमालाच्याच निर्णयाच्यामागे लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

कन्नूरमध्ये १२० भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. ज्या विचारधारेसाठी या कार्यकर्त्यांनी बलिदान दिलंय. त्या विचाराचा कधीच पराभव होणार नाही, याचं आश्वासन देतो, असं शहा म्हणाले. २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत दोन हजाराहून भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.