पाकिस्तानने हाफीज सईदच्या दहशतवादी संघटनांवरील बंदी उठवली

0
9

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या जमात-उद-दवा आणि फलाह-ई-इंसानियत या दहशतवादी संघटनांवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानने उठवली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी काही काळाकरता ही बंदी घातली होती व ती बंदी सरकारने पुन्हा वाढवलेली नसल्याचे हाफीज सईदच्या वकिलाने न्यायालयात सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या हाफीज सईदच्या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. याप्रकरणी हाफीज सईदने इस्लामाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हाफीज सईदचे वकील राजा रिजवान अब्बासी आणि सोहैल वराइच यांनी राष्ट्रपतींनी घातलेली बंदी ही काही काळापुरता मर्यादीत होती व आता नव्या सरकारने त्या बंदीचा अवधी वाढवलेला नाही, असे सांगतिले आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघटनांवर बंदी राहिलेली नसून सईद पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे.