पंतप्रधान मोदी सर्वांत विश्वासू मित्र : शिंजो आबे

0
12

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वांत विश्वासू मित्रांपैकी एक आहेत, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या संदेशात आबे यांनी म्हटले की, भारत एक जागतिक शक्तीच्या रुपाने समोर येत आहे. प्रशांत महासागर क्षेत्रात जपान भारताबरोबरील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी इच्छुक आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन धावणारच असा विश्वास व्यक्त करत ज्यादिवशी ही ट्रेन धावेल तो दिवस भारत-जपान यांच्या मैत्रीतील नवे पर्व असेल, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वोत्कृष्ट नेता असल्याचे सांगत आबे म्हणाले, जपान आणि भारताच्या संबंधातून जगाला खूप काही देण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र मोदींचे मत असल्याचे आबे यांनी सांगितले. जपान आणि भारतादरम्यान सुरक्षा, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, पर्यावरण आणि पर्यटनासारख्या क्षेत्रात आणखी सहकार्य वाढेल. सध्या पंतप्रधान मोदी हे जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

जपान भारताचा आर्थिक विकास आणि पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही सर्व क्षेत्रात चांगल्या स्थितीत आहोत आणि जपान भारताची आर्थिक वृद्धी आणि जपानच्या सर्वोत्कृष्ट तंत्राचा वापर करत हायस्पीड रेल्वे, भूमिगत मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. ज्या दिवशी शिंकनसेन बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद धावतील तो दिवस भारत-जपानच्या भविष्यातील मैत्रीचा चमकता तारा सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.