पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणींपुढे नतमस्तक

0
3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यापुढे नतमस्तक होत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लालकृष्ण अडवाणी यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी गेले होते. लालकृष्ण अडवाणी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी जनसंघामध्ये असल्यापासूनच एकत्र कार्य केले. भाजपा हा पक्ष घडवण्यात आणि मोठा करण्यात अडवाणींचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात गुरु शिष्याचं नातं आहे असं म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपामध्ये आणण्यात अडवाणी यांचा मोठा वाटा आहे. नरेंद्र मोदी यांचा संघ कार्यकर्ता ते गुजरातचे मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी अत्यंत जवळून पाहिला आहे. अडवाणी आणि मोदी यांच्यात बऱ्याचदा राजकीय सल्लामसलतही होत असे. ज्याप्रमाणे अटलबिहारी वाजपेयींना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरु मानत त्याचप्रमाणे ते लालकृष्ण अडवाणींनाही गुरु मानतात. या दोघांमध्ये काही काळ शीतयुद्धही रंगले होते. मात्र आज अडवाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लालकृष्ण अडवाणींपुढे नतमस्तक होत त्यांनी आपला आदरही व्यक्त केला.