दुष्काळ भीषणच! हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार – सदाभाऊ खोत

0
11

दुष्काळ भीषण असून येणार्‍या काळात भीषण पाणी व चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जनतेला पाणी देत असताना चारा छावण्या उभारण्याबरोबरच अल्प दरात काही ठिकाणी अन्नधान्य सुद्धा द्यावे लागणार आहे. दुष्काळी कामात जो अधिकारी हलगर्जीपणा करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. बुलढाणा जिल्ह्यातील जे तालुके दुष्काळ सदृश्य यादीमध्ये दाखविले नाहीत त्या तालुक्यांचा महसूल मंडळनिहाय महसूल व कृषी विभाग एकत्र अहवाल तयार करुन आठ दिवसात पाठविण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्या तालुक्यांचा सुद्धा दुष्काळी उपाययोजनेत समावेश करु, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोन दिवसीय जिल्हा दौर्‍यावर आले आहे. त्यांनी शुक्रवारी दिवसभर अनेक दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर आज शनिवारी सकाळी अधिकार्‍यांची बैठक घेवून त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थितीत होते.

पत्रकारांशी बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात मी अनेक गावात फिरलो आहे. तेव्हा नोव्हेंबर नंतर भीषण पाणीटंचाई व चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याच बरोबर अनेक तालुक्यात कमी दरात अन्न धान्य सुद्धा द्यावे लागणार आहे. त्याबाबत मी अधिकार्‍यांच्या बैठकीत सूचना केली आहे. धरणातून शेतीसाठी पाणी उपसावर लक्ष देण्याबाबत देखिल अधिकार्‍यांना सूचित केले आहे. पाहणी अहवालात जे तालुके दुष्काळी तालुके म्हणून घोषित झाले नाही त्यांचा मंडळनिहाय सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहे. महसूल व कृषी विभाग एकत्र अहवाल आठ दिवसात तयार करुन शासनाकडे पाठविणार आहे. त्यानंतर हे तालुका सुद्धा दुष्काळग्रस्त घोषित करु. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने हातात हात घालून दुष्काळात काम करण्याची आवश्यकता आहे.

तहसीलदार व इतर अधिकार्‍यांनी सुद्धा दुपारी ऑफीसनंतर गावागावाचे दौरे करावेत, अशी सूचना दिली आहे. जे अधिकारी दुष्काळाकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या जाईल. अन्नधान्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पिण्याचे पाणी व चारा छावण्या उभारण्याबरोबरच अन्नधान्य सुद्धा कमी दरात देण्याबाबत व आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेवून दुष्काळाचे भयान वास्तव त्यांच्यासमोर कथीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.