दिल्लीकरांचा श्वास कोंडला; घराबाहेर न पडण्याचा हवामान खात्याचा इशारा

0
10

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे आज अक्षरशः दिल्लीचा श्वास कोंडला. हवेतील प्रदूषणाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) 381 पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत श्वास घेणे धोकादायक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडण्याचा सल्ला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिल्लीकरांना दिला आहे. दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाची पातळी आणखी वाढणार असल्याचा इशारा दिला.

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत आज सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदली आहे. ही हवा दिल्लीकरांच्या आरोग्याला धोकादायक असल्याचे प्रदूषण नियंत्रण बोर्डाने म्हटले आहे. दिल्लीतील वाहनांची वाढती संख्या आणि कारखान्यांमधून बाहेर पडणाऱया विषारी धुरामुळेच प्रदूषण वढले आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले प्रदूषण पाहता सरकारी प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

पन्नास निर्देशांकापर्यंतची हवा स्वच्छ
हवेमध्ये शून्य ते पन्नास एवढा प्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) असला तर ती हवा शुद्ध समजली जाते, तर 51 ते 100 दरम्यानची हवा प्रदूषित असली तरी श्वसनाला कोणताही धोका नसतो. पण त्यापेक्षा अधिक प्रदूषण असेल तर ती आरोग्याला धोकादायक समजली जाते. पण आज दिल्लीतील हवेचे प्रदूषण 381 निर्देशांकापर्यंत पोहचल्याने ती श्वसनासाठी धोकादायक असल्याचे सांगत घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नागरिकांना केले आहे.