ताजमहालमध्ये घुसले पाणी, ६ जणांचा मृत्यू

0
9

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे पावसाने हाहाकार माजवला असून प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांपासून आग्रा शहर आणि परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या आग्र्याच्या जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये पावसाचे पाणी शिरले असून आतापर्यंत ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ४ लाखांची मदत घोषित केली आहे.

आग्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून जवळपास ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. तुफान पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नदीचे रुप घेतले होते. अशातच गुरुवारी आणि शुक्रवारीही काही भागात चांगला पाऊस झाला. पावसामुळे आग्रामधील ताजमहालमध्ये पाणी शिरल्याने पर्यटकांची चिंता वाढली आहे. तसेच खराब परिस्तिथीमुळे काही भागातील शाळा आणि कॉलेजला २७ आणि २८ जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच शुक्रवारी रात्री आग्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशी सुचना देण्यात आली आहे.