डेंगीचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापुरात

0
4

राज्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण यंदा कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि त्यापूर्वी मुंबई या दोन प्रमुख शहरांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले आहे. गेल्या वर्षभरात सात हजार ८०० रुग्णांना डेंगी झाला होता. आतापर्यंत राज्यात सहा हजार रुग्णांना डेंगीचे निदान झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंगीने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात २०१७ मध्ये ६५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ते प्रमाण आता १८ पर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे, असेही आरोग्य खात्यातून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

याबाबत राज्याच्या आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘राज्यात आतापर्यंत पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. या वर्षी डेंगीचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर येथे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा सर्वांत जास्त डेंगीच्या रुग्णांचा मृत्यूही त्याच जिल्ह्यात झाला आहे. त्या तुलनेत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात डेंगीवर नियंत्रण ठेवता आले.’’