ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

0
9

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मुंबईतील दादर येथे असणाऱ्या शुश्रूषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे अतिशय अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे निदान झाले होते.

त्यांच्या निधनामुळे मराठी भावगीत विश्वार शोककळा पसरली आहे. अनेक गीतांना सुमधूर आणि तितकच प्रभावी अशी चाल लावत यशवंत देव यांनी प्रेक्षकांच्या मनामनात कायमचे स्थान मिळवले होते. यशवंत देव यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील मोठे नाव हरपल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

शब्दप्रधान गीतांवर भर देत नवनवीन कवी आणि गीतकारांना पुढे आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते. भावनांना स्वरांचे रुप देत त्याची सुरेल गुंफण करणाऱ्या देव यांचे संगीत विश्वातील योगदान अतुलनीय आहे. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमधील कित्येक गाणी ही आजही अनेकांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’ या आणि अशा कित्येक गाण्यांची सुरेल बांधणी देव यांनी केली होती.

सोपी पण तितकीच प्रभावी आणि मनात घर करणारी गाण्याची चाल हे त्यांच्या गीतांचं गुणविशेष. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भावगीत विश्वातील ‘देव’ होते, असंच म्हणावं लागेल. आपल्या लेखनकौशल्य आणि संगीत दिग्दर्शनाने अनेक वर्ष त्यांनी संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजविले. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली. त्यांनी केलेली अनेक विडंबनगीते केली. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत.

याशिवाय, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय.