जम्मू आणि काश्मीर : चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

0
4

जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात झालेल्या ताज्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. मात्र, यामध्ये आपला एक जवानही शहीद झाला आहे. दरम्यान, या भागात अजूनही कारवाई सुरु आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग दोन दिवस लष्कराने शोध मोहिम राबवली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा उत्तर काश्मीरच्या सोपोर भागात लष्कराकडून कॉर्डन आणि शोध मोहिम सुरु होती, यावेळी दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरु केला. सुत्रांच्या माहितीनुसार, या भागात ४ ते ५ दहशतवादी लपून बसले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवानही शहीद झाला असून एक गंभीररित्या जखमी झाला आहे. या जवानाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय राइफल्स, स्पेशल ऑपरेशंस ग्रुप ऑफ पोलीस (एसओजी) आणि केंद्रिय राखीव पोलीस बल (सीआरपीएफ) हे संयुक्तरित्या ही मोहिम राबवत आहेत.

यापूर्वी गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या जागी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली होती. एका शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला होता. त्यानंतर चकमक सुरु झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. तर त्याचवेळी अनंतनाग जिल्ह्यातही झालेल्या एका चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले होते.

गुरुवारी संध्याकाळी त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी लष्काराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्प क्रमांक ४२वर हल्ला केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला होता. तर, बुधवारी नौगाममधील सुथूमध्ये सुरक्षा रक्षकांनी २ दहशतवाद्यांना ठार केले होते.