गुगल मॅपवर आता आमिर खान दाखवणार वाट

0
11

चित्रपटाच्या यशामागे त्याच्या प्रमोशनाचाही तितकाच वाटा असतो असं म्हणतात. म्हणूनच प्रमोशन किती हटके पद्धतीने करता येईल यावर कलाकारांचा अधिक भर असतो. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असेच काही अनोखे फंडे वापरत आहे.

आमिर खान लवकरच गुगल मॅपवर अवतरणार आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात आमिर ‘फिरंगी भल्ला’ ही भूमिका साकारत आहे. हेच पात्र आता गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे. गुगल मॅप वापरताना तुम्ही अॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोनवर या फिरंगीसोबत प्रवास करण्याचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर ‘फिरंगी भल्ला’ हा गाढवावार बसून प्रवास करताना दिसणार आहे आणि त्याचसोबत वाट दाखवणार आहे.

आमिरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबतच अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. हिंदी सोबतच तामिळ आणि तेलगू भाषेमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत.