काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी अंतिम टप्प्यात, 38 जागांवर एकमत

0
6

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँगेस-राष्ट्रवादी आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. 48 पैकी 38 जागांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले असून उर्वरित जागांचा तिढाही सुटेल, असे काँगेसच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करूनच निवडणूक लढवणार आहे आणि जागावाटपासाठी जोरबैठका सुरूच आहेत. किती जागांचा तिढा सुटला हे सांगण्यास काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नकार दिला असला तरी चर्चेत सहभागी झालेल्या एका काँगेस नेत्याने 38 जागांचा प्रश्न मिटल्याचे सांगितले आहे. किरकोळ अपवाद वगळता जागावाटपाचे सूत्र गेल्या निवडणुकीसारखेच असेल आणि जेथे वाद नाहीत त्या जागांचा प्रश्न मिटला आहे, असे हा नेता म्हणाला.

राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादीने काँगेस कोट्यातील संभाजीनगर, पुणे आणि यवतमाळ या जागांवर दावा केला आहे. 2014 मध्ये 26:22 असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने ती जागा अखेर काँगेसने लढवली होती. म्हणजेच गेल्या निवडणुकांत काँगेस 27 तर राष्ट्रवादी 21 जागांवर लढली होती. रायगड आणि हिंगोलीच्या जागांची तेव्हा अदलाबदल करण्यात आली होती.

काँग्रेसच्या तीन जागा
हातकणंगले, पालघर आणि अकोला या काँग्रेसच्या ताब्यातील तीन जागा आघाडीत सहभागी छोटय़ा पक्षांना देण्याचे ठरले आहे. म्हणजेच काँगेस 24 जागा लढवणार आहे असे काँगेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सात ते आठ जागांचा वाद असून 2 नोव्हेंबरला चर्चेची आणखी एक फेरी होईल. त्यात तिढा न सुटल्यास दोन्ही पक्षांचे केंद्रीय नेते बैठक घेतील आणि जागावाटपाचे अंतिम सूत्र जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.