काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर

0
8

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 15 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. परंतु, या 15 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा समावेश नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या शुक्रवारी महाराष्ट्रातील 26 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

उद्या शुक्रवारी काँग्रेसची दिल्लीत निवड छाननी समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा नावावर चर्चा होणार आहे. अशीही चर्चा आहे की, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते थेट भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात मैदानात उतरली. नागपूरची जागा आपल्याला मिळावी अशी इच्छा पटोले यांनी व्यक्त केली होती.

संजय काकडेंना उमेदवारी?

तर दुसरीकडे पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आधीच काँग्रेसचे निष्ठावंत नेते मोहन जोशी, अभय छाजेड यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, निष्ठावंतांना डावलून आयाराम उमेदवाराला उमेदवारी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, संजय काकडेंनी उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.तसंच पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.