काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर- विनय कटियार

0
8

काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याचा आरोप भाजप नेते विनय कटियार यांनी केला. मोठ्या प्रतिक्षेनंतर रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला होता. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून पुढील तारखा निश्चित होण्याची शक्यता होती. परंतु न्यायालयाकडून ही सुनावणी थेट जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपला या निकालाचा फायदा होऊ शकतो. मात्र, खटल्याची सुनावणी लांबणीवर पडल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळेच विनय कटियार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अयोध्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यामागे काँग्रेसचा हात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल लागू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांच्यामार्फत दबाव निर्माण करून खटल्याची तारीख पुढे ढकलली जात असल्याचे कटियार यांनी म्हटले.