आॅनलाईन कंपन्यांना कोट्यवधीचा ‘झटका’

0
7

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांनी कोट्यवधी रूपयांच्या वस्तूंची आॅर्डर केली मात्र ऐनवेळी याच ग्राहकांनी या वस्तू घेण्यास नकार दिल्याने आॅनलाईन कंपन्यांना नाईलाजास्तव हा माल परत बोलविण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी कोट्यवधी रूपयांच्या विविध वस्तू कुरिअर कंपन्यांत पडून आहेत.

ग्राहकांना आॅनलाईनच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या वस्तू पुरविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत शहरातील शेकडो ग्राहकांनी आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून मोबाईल आणि इतर वस्तूंची आॅर्डर दिली. आॅर्डर दिल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत या वस्तू ग्राहांच्या पत्यांवर कुरिअर कंपनीच्या माध्यमातून पोहोच झाली. या ग्राहकांनी मात्र या वस्तू घेण्यास नकार दिला. परिणामी हा सर्व माल कुरिअर कार्यालयात पडून आहे. शहरातील काही कुरिअर कार्यालयात तर हा माल ठेवण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे सदर आॅनलाईन कंपन्यांनी ट्रक पाठवून हा माल परत नेण्यास सुरूवात केली आहे. डिलेवरी रिजेक्ट करणा-या ९९ टक्के ग्राहकांनी आॅनलाईनच्या माध्यमातून मोबाईल आॅर्डर केले होते. आॅर्डर देऊन डिलेवरी का रिजेक्ट केली जात आहे. या विषयाची शहरात चर्चा रंगली आहे.