आदित्य ठाकरेंना लोकसभेत आणण्याची भाजपाची तयारी

0
12

महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्तीशाली राजकीय ठाकरे कुटुंबातील कोणीही आजपर्यंत संसदेची निवडणूक लढवली नाही. परंतु, तशी घटना घडणार असे दिसते. शिवसेनेचे दिवंगत प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. मात्र शिवसेनेने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
इकडे दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाच्या चर्चेनंतर त्यांना जास्तीतजास्त मतांनी विजयी करण्याच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.

भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे की, ही बाब आमच्यासाठी मैलाचा दगड ठरेल. विशेषत: भाजपा व शिवसेना यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे निर्माण झालेली कटुता यामुळे दूर होऊ शकेल. याच कारणामुळे आम्ही आमच्याकडून त्यांना जास्तीतजास्त मतांनी जिंकून आणण्यासाठी पावले उचलण्यास तयार आहोत.

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का यावर दुसरा भाजपाचा नेता म्हणाला की, सध्या तरी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील राजकारणात खूपच व्यस्त आहेत. नजिकच्या भविष्यात आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याची कोणतीही शक्यता नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्यातील सर्वोच्च पदाचा दावेदार बनण्यासाठी बराच वेळ आहे. तोपर्यंत ते केंद्रातील राजकारणात भूमिका बजावू शकतात. अर्थात अंतिम निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असतील तर त्यांना भाजपा मुंबईतील आपली कोणतीही जागा देईल हे शक्य आहे का? आदित्य ठाकरे यांच्यासाठी मुंबई (उत्तर-मध्य) मतदारसंघ सुरक्षित आहे, असे यापूर्वी समोर आले आहे. या मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचा दबदबा आहे. परंतु, सध्या या मतदारसंघात भाजपाचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन खासदार आहेत. भाजपा शिवसेनेसाठी आपली ही जागा सोडेल का, असे विचारले असता महाराष्ट्रातील एका केंद्रीय नेत्याने म्हटले की, आधी शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव तर येऊ द्या. त्यानंतर इतर मुद्यांवर चर्चा केली जाईल.