अशोक पत्की यांना जीवन गौरव पुरस्कार

0
7

अमरवाणी न्यूज,२४ ऑक्टो: झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.

झी मराठीवरील मालिका आणि त्यातील कलाकार जितके लोकप्रिय आहेत तितकीच सर्व मालिकेची शीर्षक गीतं देखील श्रवणीय आहेत. अगदी आभाळमाया ते सध्या चालू असलेल्या मालिकांची शीर्षक गीतं ही प्रेक्षकांच्या ओठांवर अगदी रुळली आहेत. ही शीर्षक गीतं मालिकेची फक्त ओळख राहिली नसून आजच्या युगात ती काहींच्या फोनची रिंगटोन तर काहींच्या म्युजिक गॅलरीमध्ये सेव्ह झाली आहेत. संगीतकार अशोक पत्की यांचं या शीर्षक गीतांमुळे झी मराठीशी एक अतूट नातं निर्माण झालं आहे. या सर्व गीतांच्या सुंदर रचनेमागे अशोक पत्कीअसून त्यांच्या इतक्या वर्षाच्या या सांगीतिक प्रवासाचं कौतुक नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या या सांगीतिक प्रवासात झी मराठी आणि त्यांचं नातं कसं दृढ झालं हे त्यांनी सांगितलं. झी मराठीच्या सर्व कलाकारांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, २८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.