अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

0
10

अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन, सीएनएन वृत्तवाहिनीला टपालाने पाठवण्यात आलेल्या स्फोटकांसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या घटनेचा तपास सुरु असून आपण सर्वांनी आता एकत्र येऊन अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नसल्याचा संदेश पोहोचवला पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

बुधवारी अमेरिकेत महत्त्वाच्या व्यक्तींना टपालाद्धारे स्फोटकं पाठवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयात, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या न्यूयॉर्कमधील निवासस्थानी आणि न्यूयॉर्कमधील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात टपालाद्वारे स्फोटकं पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या तिन्ही ठिकाणी स्फोटकं पाठवणारी ही एकच व्यक्ती किंवा संघटना असावी, अशी शक्यता अमेरिकेतील तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेतील नागरिकांची सुरक्षा ही माझ्यावरील सर्वोच्च जबाबदारी आहे. मी एफबीआय, गुप्तचर विभाग आणि अन्य यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अशा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही, हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे ट्रम्प यांनी सांगितले.