अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व हरपले – खा.रावसाहेब पाटील दानवे

0
9

अमरवाणी न्यूज, १६ जानेवारी : भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती प्रा.ना.स.फरांदे यांच्या निधनाने एक अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व गमावले, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी अर्पण केली.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, प्रा.फरांदे यांचा संतसाहित्याचा गाढा अभ्यास होता व त्यांना वक्तृत्वाची देणगी लाभली होती. शांत व संयमी स्वभाव तसेच कार्यकर्त्यातील नेता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील जडणघडणीत मोठे योगदान दिले. प्रा.फरांदे हे 1991 ते 1995 या कालावधीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. याच काळात भाजपाचा राज्यात वेगाने विस्तार झाला व 1995 साली भाजपा राज्यात सत्तेवर आली. समाजाच्या विविध घटकांचा पाठिंबा भाजपाला मिळावा यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. 1998-2004 या कालावधीत विधान परिषदेचे सभापती या नात्याने प्रा.फरांदे यांनी संसदीय लोकशाही बळकट करण्यास मदत केली. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी सभापती पदाची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडली. त्यांच्या निधनाने भाजपाने एक अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी केली.