अपघात रोखण्यासाठी राज्यातील रस्त्यांवर 1 हजार 235 डार्क स्पॉट्स

0
1

राज्यातील महामार्गांवर अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन प्लॅन तयार करीत आहे. पेंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे यासाठी पावले उचलत आहे. यासाठी राज्यभरातील रस्त्यांवरील 1 हजार 235 अपघातप्रवण क्षेत्र म्हणजे ‘डार्क स्पॉट्स’ शोधण्यात आले आहेत. या भागांतील अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार अॅक्शन प्लॅन तयार करीत असून याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयालाही सादर होणार आहे.

देशभरातील रस्ते अपघातांत दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागत असतो. हे अपघात रोखण्यासाठी सर्वेच्च न्यायालयानेही समिती स्थापन केली आहे. या समितीलाही अपघात रोखण्यासाठीचा अॅक्शन प्लॅन सादर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच गृह विभाग मिळून यात काम करीत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक खासदाराच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीअर या समितीचे सदस्य असणार आहेत.

असे निवडले डार्क स्पॉट्स
रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरस्पीडिंग तसेच दारू पिऊन गाडी चालविणे ही अपघातामागची कारणे आहेत. डार्क स्पॉट्स निवडताना गेल्या तीन वर्षांतील रस्ते अपघातांची आकडेवारी अभ्यासण्यात आली आहे. एकाच ठिकाणावर वर्षभरात तीन अपघात घडणे हा यातील प्रमुख निकष आहे. त्याचप्रमाणे एकच अपघात झाला असेल पण त्यात दहापेक्षा अधिक बळी गेले असतील अशा जागेचाही यात समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणांवर सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना म्हणजे अवघड वळण काढून रस्ता रुंद करणे, रस्त्याशेजारी बॅरिकेड्स उभारणे यासारख्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

जनजागृती करण्यात येणार
रस्ते अपघातांबाबत आता जनजागृती करण्यात येणार आहे. परिवहन विभागातर्फे त्यासाठी कोचिंग सुरू करण्यात येईल. रॅश ड्रायव्हिंग, दारू पिऊन गाडी चालविणे किती धोक्याचे असते हे वाहनचालकांना समजावून देण्यात येणार आहे. सोशल मीडियाचीदेखील त्यासाठी मोठय़ा प्रमाणात मदत घेण्यात येणार आहे. लहान वयातच याबाबत जागृती व्हावी म्हणून लहान मुलांनाही गेम्सच्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.